…तर महिन्या दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट!; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक ती औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

टास्क फोर्स मधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो. दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबर पासून देशाला ४२ कोटी लसी मिळतील, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्त्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यकच आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर किट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here