यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत बोगस बियाणे विक्रेते सक्रीय झाले असून, कृषी विभाग व ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १९ लाखांच्या कपाशीच्या (एचटीबिटी) अवैध बियाण्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रवींद्र जनार्धन बंधाटे (२८) रा. वटबोरी, ता. कळंब यास अटक करण्यात आली.
बुधवारी रात्री यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जोडमोहा ते यवतमाळ मार्गावर गस्त घालत असताना सहायक फौजदार भगवान बावणे यांना एक संशयास्पद चारचाकी (क्र. एमएच २७, बीव्ही ६३६२) आढळली. पोलिसांनी पाठलाग करून हे वाहन रोखले. त्याची तपासणी केली असता, त्यात २६ पोत्यांमध्ये १९ लाख १८ हजार ९८५ रूपये किंमतीचे ८६४ किलो कापसाचे बियाणे आढळले. शिवाय बियाणे पॅकिंगकरीता छपाई केलेली दोन हजार रिकामी प्लास्टिक पाकीटे आढळली.
वाहन चालक रवींद्र बंधाटे हा याबद्दल कोणतीही माहिती व्यवस्थित देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी हे वाहन ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले व कृषी विभागास माहिती दिली. आज गुरूवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कृषी अधिकारी पंकज बरडे, बियाणे निरीक्षक नीलेश ढाकुलकर आदींनी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या बियाण्यांची तपासणी केली असता, हे अप्रमाणित बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचे निष्पन्न झाले.






