अलीबाग तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी अध्यक्ष अशोक वारगे यांची अलिबाग कोविड सेंटरला भेट
अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे वैद्यकीय सोयींचे अपूर्णत्व उघडे पडले. विशेषत: अपुऱ्या खाटांमुळे काही रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचे जीव गेले. यामुळे तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन प्रशासन वैद्यकीय सोयी उभारण्यावर आता भर देत आहे. मात्र घाईगडबडीत उभ्या केलेल्या कोविड सेंटरचेदेखील नित्कृष्टत्व आता समोर येऊ लागले आहे. असाच काहीसा प्रकार अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये उघड झाला आहे.
रायगड जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका इमारतीमध्ये घाई गडबडीत कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी केले. या कोविड सेंटरच्या उभारणीदरम्यान बांधकामाकडे लक्ष दिले गेले नसल्याने ७० खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे कालपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोविड सेंटरमध्ये गळती लागली असून, सगळ्या स्लायडिंग विंडोमधून पाणी आत येत आहे. भिंतींनीही पूर्णपणे ओल धरली आहे तर स्लॅबमधून पाणी गळत असल्याने पेशंटच्या बेडवर पाणी पडत आहे. तसेच याठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी एकच स्वच्छतागृह असल्याने महिला पेशंटना याचा खूपच त्रास होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसीचे अध्यक्ष अशोक वारगे यांनी या कोविड सेंटरला भेट दिली असता त्यांच्या दृष्टीस हा प्रकार पडल्याने या प्रकाराची चौकशी आम्ही करणार असल्याचे अशोक वारगे यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना सांगितले






