सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या नजीकच्या रुग्णालयातच आरोग्यविषयक सर्व सुविधा अगदी माफक दरात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नियोजित ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालय, बोरामनीला थेट अमेरिकेहून सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत अनेक वैद्यकीय उपकरणे भेट म्हणून देण्यात आले.
कोरोना काळात याच ग्लोबल व्हीलेज ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर च्या मार्फत अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देत असतानाच अमेरिकेहून थेट ग्लोबल व्हीलेज ग्रामीण रुग्णालय पर्यंत सेवा इंटरनॅशनल या संस्थेने ५ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, २ बायप्यप मशीन, पल्स ऑक्सी मीटर, इन्फ्रारेड थरमोमीटर, फेस मास्क, पिपिई किट व ३० अद्ययावत हॉस्पिटल बेड आदी साहित्य पोहोचविण्याचे काम केले.
दक्षिण सोलापुर तालुक्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटर मध्ये ही सर्व उपकरणे गुरुवारी सायंकाळी दाखल झाली. या सर्व उपकरणांचा या भागातील गरजू रुग्णांना ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा दिली जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी दिली.
या सर्व उपकरणांचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. शीतलकुमार जाधव व माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश दुधनी यांच्या शुभहस्ते तर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरामनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरन्ना राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव यांनी ग्लोबल व्हिलेजच्या परिसराचे कौतुक केले व संस्थेमार्फत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी करीत असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
सेवा इंटरनॅशनल, अमेरिकेच्या वतीने या सर्व वस्तू ग्लोबल व्हीलेजपर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा इंटरनॅशनल संस्थेचे सर्व पदाधिकारी व मूळचे अक्कलकोटचे पण सध्या अटलांटा, अमेरिका येथे स्थायिक असलेले डॉ. अजय हौदे यांनी तर भारतातून हैदराबादचे सेवा कार्यकर्ते श्री. आर. के. अनिल, केरळचे डॉ. डी. सरवण, दिल्ली येथील श्री. दीपक सिंग, श्री. विजय मिश्रा यांनी परिश्रम घेतले. या सर्व सेवा कार्यकर्त्यांचे संस्थेच्या वतीने प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य विनील जांभळे, प्राचार्या अस्मा नदाफ, श्री. मल्लिनाथ जळकोटे, डॉ. पूजा जाधव, श्री. अप्पासाहेब घुगले, श्री. अविनाश राठोड, सौ. रंजना दुपरगुडे, श्रीमती इंदुबाई सुतार यांचे सहकार्य लाभले.






