कोविड–१९ च्या आजाराने मयत झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीस अटक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कोविड–१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वसामान्य नागरीक हे ऑनलाईन व्यवहारास, देवाणघेवाणीस प्राधान्य देत आहेत. परंतु याच काळात सायबर गुन्हेगार वेगवेगळया क्लृप्त्या वापरुन, शक्कल लढवून मोठया प्रमाणात नागरीकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या तक्रारीही पोलीसांकडे प्राप्त होत आहेत. सदर तक्रारींच्या अनुशंगाने वरिष्ठांनी सायबर गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत.
दिनांक २५/०७/२०२० रोजी कक्ष–११ चे प्रपोनि चिमाजी आढाव यांना खास बातमीदाराकडून माहीती मिळाली की, सायबर गुन्हेगारांची एक टोळी कोविड–१९ च्या आजाराने मयत झालेल्या एका बांधकाम व्यवसायिकाचे वेगवेगळया बँकांतील खात्यांमधून करोडो रुपये मध्यरात्रीच्या वेळी परस्पर ऑनलाईन दुसऱ्या खात्यांमध्ये वळवून लंपास करणार आहेत. याबाबत मिळालेली माहिती वरिष्ठांना अवगत करून त्यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे कक्ष–११ चे पथकाने दहीसर परिसरातील एका झोपडपट्टीमध्ये असलेल्या रुममध्ये छापा टाकला. सदर ठिकाणी चार इसम हे लॅपटॉप मोबाईल फोन व मयत इसमाचे बँक खात्यांची माहीती असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन ट्रान्झंक्शन करीत असताना मिळुन आले. त्यांचेकडे असलेला मोबाईल फोन चेक केला असता त्यामध्ये ऑनलाईन ट्रान्डॉक्शन करीता वापरण्यात येणारे अॅप्स गुगल पे, फोन पे तसेच वन टाईम पासवर्डस् आढळले. त्यांनी मयत इसमाचे नांवे असलेल्या बँक खात्यांवर ट्रान्झंक्शन करीता बनावट युझर आयडी व पासवर्ड बनवून त्याचा वापर करीत असल्याचे देखील आढळुन आले.
सदर इसमांकडे केलेले अधिक तपासात मयत इसमाचे वेगवेगळया बँक खात्यांवर रजिस्टर्ड असलेला मोबाईल फोन क्रमांकांचे डुप्लीकेट सिम कार्ड प्राप्त करण्याकरीता सदर टोळीने मयत इसमाचे नावाने बनावट आधारकार्ड बनवुन त्याच क्रमांकाचे मोबाईल सिमकार्ड प्राप्त केले. सदर मोबाईल फोनच्या सहाय्याने वन टाइम पासवर्ड प्राप्त करुन ते वेगवेगळया पे अँप्स द्वारे, नेटबॅकींगद्वारे मयताच्या बँक खात्यातून पैशाची अफरातफर करीत असल्याचे आढळले. सदर टोळीमधील एक सदस्य हा मयत इसमाचे कंपनीचे कार्यालयात काम करीत असल्याची व त्यानेच मयताचे कार्यालयातून अविश्वासाने बँक खात्यांची कागदपत्रे, चेकबुक्स, रोख रक्कम ही लंपास केली व त्याचे साथीदारांना दिली. सदर टोळीमधील दुसऱ्या सदस्याने स्वत:चा फोटो मयताचे आधारकार्डवर चिटकवून त्याची बनावट डिजीटल प्रत बनविली व ती गॅलरीत देवून बँकात रजिस्टर्ड असलेले त्याच क्रमांकाचे सिमकार्ड विकत घेवून मोबाईल फोनमध्ये अॅक्टीवेट केले. टोळीतील तिसरा सदस्य हा पूर्वी वेगवेगळया नामांकीत बँकांमध्ये नोकरीस होता, तद्नंतर तो परदेशात नोकरी करीत होता, लॉकडाऊनमुळे तो भारतात परतला आहे. सदर सदस्य हा लॅपटॉप, मोबाईल फोनच्या आधारे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरुन, ओटीपीचा वापर करुन दुसऱ्या खात्यांमध्ये पैसे वळवित होता. सदर आरोपी वापरत असलेले सॉफ्टवेअर व त्याचे सर्वर हे परदेशातील आहेत. त्या सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोनचे आयपी अॅड्रेसचे लोकेशन्स हे परदेशातील दिसतात, त्यामुळे सदरचा फ्रॉड हा परदेशातून झाल्याचा बनाव ते निर्माण करणार होते.
कोविड–१९ च्या आजाराने मयत झालेल्या इसमाचे अरलॅब्स प्रा. लिमीटेड, प्रभाव प्रॉपर्टीज लिमीटेड या नामांकीत कंपन्या आहेत. सदर कंपन्यांची तसेच मयत व्यक्तीची वैयक्तीक खाती वेगवेगळया बँकांत आहेत. दिनांक २०/०६/२०२० रोजी सदर कंपनीचे मालक हे मयत झाले. त्यांच्या वारस पत्नी हया वयोवृध्द आहेत व दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. कंपनीचे मॅनेजर हे बॅकांचे सर्व व्यवहार हाताळतात. सदर बँक खात्यांवर रजिस्टर्ड असलेला मोबाईल फोन हा मॅनेजर यांच्या कस्टडीत आहे. सदर बाबत कंपनीचे मॅनेजर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांचे नमूद कंपनीचे कार्यालयातून बँकांची कागदपत्रे, चेक बुक्स व रोख रक्कम ही गहाळ झाल्याची माहीती दिली. त्याबाबत त्यांनी तक्रार केल्याने जुहु पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक २२९/२०२० कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भादंवि अन्वये दिनांक २५/०७/ २०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठांनी गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई कडे वर्ग केल्याने त्याबाबत डि.सी.बी.सी.आय.डी. गु.र.क्र. ११३/२०२० अन्वये फेरनोंद घेवून पुढील तपास कक्ष–११ करीत आहे. अटक आरोपींचे वर्णन:१) एक ३५ वर्षे वयाचा इसम, राठी- रुम नं १२, हॉटेल वेस्टर्न पार्कच्या पुढे, जयमाता चाळ, डेचकूल पाडा, काशिमीरा, मिरारोड, जि-ठाणे. २) एक २८ वर्षे वयाचा इसम, राठी- जी-४०१, संघवी एम्पायर, नया नगर, मिरारोड, जि-ठाणे. ३) एक ३९ वर्षे वयाचा इसम, राठी-न्यू स्वस्तिक म्हाडा, एल १०, रुम नं १०१, शांती गार्डन, मिरारोड (पू), जि-ठाणे. ४) एक ३३ वर्षे वयाचा इसम, राठी-न्यू स्वस्तिक, म्हाडा, एल १०, ए-०२, शांतीगार्डन जवळ, मिरारोड (पूर्व), जि-ठाणे.
वरीलप्रमाणे नमुद आरोपीतांना दिनांक २५/०७/२०२० रोजी अटक करून त्यांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ३१/०७/२०२० रोजीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप कर्णिक (अतिरिक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त (गुन्हे)), मा. पोलीस उप-आयुक्त (प्र-१) श्री. अकबर पठाण, यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पो.नि. रईस शेख, पो.नि. सलील भोसले, स.पो.नि. शरद झिने, विशाल पाटील, स.फौ. नरेंद्र मयेकर, अविनाश शिंदे, अंमलदार सुधीर कोरगांवकर, विनायक साळुखे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, सत्यनारायण नाईक, नितीन शिंदे, राजू गारे, राजेश चव्हाण, दिलीप वाघरे, संतोष माने, सुबोध सावंत, महादेव नावगे, राकेश लोटणकर, अजय कदम, सचिन कदम, जयेश केणी, अजित चव्हाण, निलेश शिंदे, महेश रावराणे, श्रीमती रिया अणेराव, प्रशांत ढगे, उपेंद्र मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here