नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटला

कोपरगाव (प्रतिनिधी) – नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात होटेल द्वारकमाई जवळ डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. यात एक मोटारसायकल चालक जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच ४६ बी बी ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना उलटला. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास कोपरगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.

उलटलेला टॅंकर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले असून दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे. या ठिकाणी कोल्हे कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाल्या आहेत. संबंधित कंपनीला या अपघाताबाबत कळविले असून त्यांचे तंत्रज्ञ या ठिकाणी पोहोचत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here