नागपूर (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणुन बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी न आल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे पद्भार सोपवून ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्या रिक्त जागी आज मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
प्राजक्ता लवंगारे-वर्मा ह्या 2001 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून 2009 साली काम पाहिले. तिथे धवल भारती अभियान राबविले. नंतर मुंबईत मुखय सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडे सहसचिव म्हणून काम केले. विक्रीकर आयुक्त असताना सिगरेट कमोडिटीमध्ये 100 कोटींची चोरी पकडली. मुंबई येथील सिडकोच्या सहसंचालकपदी काम केले. त्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्त असताना वर्षभरात म्हणजे 2019-20 मध्ये 1008 कोटीचा अतिरिक्त महसूल मिळवून दिला.
मंत्रालयात मराठी भाषा सचिव म्हणून कार्यरत असताना कोरोना काळात मुंबईतील स्थलांतरितांना वेळच्या वेळी भोजन मिळावे, तसेच त्यांचे अन्य प्रश्न सोडवण्याबरोबरच रुग्णालयांसाठी स्वयंसेवक तयार करण्याची जबाबदारी सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यावर शासनाने सोपविली होती. प्राजक्ता लवंगारे या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून समोर आलेल्या अधिकारी आहेत. त्यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत निरीक्षक तर आई महानगरपालिकेच्या भगवती हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या. त्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम करीत होत्या. विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना फलदायी ठरल्या. लवंगारे आतापर्यंत ज्या ज्या पदांवर होत्या, ती जबाबदारी निष्ठेने पार पाडली. लोकाभिमुख प्रशासन देण्यावर त्यांचा भर आहे.






