संजय राऊत यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात, अशी तक्रार एका 36 वर्षीय महिलेने केली. या तक्रारीनुसार चौकशी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.

मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या महिलेने फेब्रुवारीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे. याचिका दाखल केल्यावर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली.

पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे, असं याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी सांगितलं. याचिकाकर्ती गेले 12 दिवस कारागृहात आहे. तिने याचिका दाखल केल्यावर पोलीस तिच्यामागे लागले, असं सिंग म्हणाल्या.

दरम्यान, याचिकाकर्तीच्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. तसेच 24 जूनपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here