मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही अत्याचारी; भाजपाचा गड म्हटल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात नाना पटोलेंचा एल्गार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे आज (बुधवारी) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी करुन त्यांनी आपल्या दौऱ्याचा प्रारंभ केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनतेच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.

केंद्रातल्या अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले. त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ५० वे अधिवेशन व पहिले ग्रामीण अधिवेशन घेतले होते.

पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचे काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची ५ वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. २०२४ मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here