पंढरपूर येथे विशेष कोविंड रुग्णालय उभारण्याची मागणी

पनवेल (विष्णू गवळी) – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना चा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी सोयीचे होईल असे विशेष कोविंड रुग्णालय पंढरपूर येथे उभारण्यात यावे, व त्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मंगळवेढ्याचे सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक विष्णू गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात पंढरपूरची संख्या चारशेच्या पुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील 65 एकर क्षेत्र, मंदिर समितीचे भक्तनिवास, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि खाजगी रुग्णालयातील 80% बेड राखीव ठेवून पंढरपुरात कोरोना बाधितावर उपचार करण्याची सोय करावी. अशी मागणी गवळी यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पंढरपुरात दोन हजार विद्यार्थी संख्या असलेले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आहे. विठ्ठल मंदिर समितीच्या भक्तनिवासात पाचशे बेडची सुविधा होऊ शकते. वारीसाठी वापरण्यात येणाऱ्या 65 एकर क्षेत्राचाही चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय शहरातील खाजगी रुग्णालयातील 80% बेड राखीव ठेवल्यास सोलापूर जिल्हा रुग्णालयावर येणारा ताण कमी होईल. सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा करमाळा माढा व मोहोळ या तालुक्यांना पंढरपूर हे मध्यवर्ती आणि सोयीचे ठिकाण असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतील.
यासाठी पंढरपुरात 1000 बेडचे स्वतंत्र रुग्णालय, 100 व्हेंटिलेटर, 10000 रॅपिड टेस्ट किट त्याचबरोबर पी पी ई किट सह वैद्यकीय पथक देऊन त्वरित रुग्णालय उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here