नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. काल पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती दिल्लीत पोहोचल्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह केंद्रशासित प्रदेशातही हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू – काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन युतीचा एक भाग आहे. ज्याची मंगळवारी बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांशी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात पंतप्रधान काश्मीरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलणार आहेत. केंद्र सरकारबरोबर झालेल्या या बैठकीत ८ राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
केंद्रात असणाऱ्या भाजपच्या सरकारकडून कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते. तेव्हापासूनच जम्मू काश्मिरातील काही राजकीय संघटनांचा आणि पक्षांचा याला विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यावेळी जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.






