आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन हे निर्देश दिल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महानगर पालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विशेष प्रयत्नाने आज दूरदृष्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पदुम मंत्री सुनील केदार, झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निंबाळकर, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आंबिल ओढ्यातील रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करु नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन बाधितांना कायमची घरे देण्यात यावी, अशा सूचना डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

त्यावर राज्य शासन सर्वांना घरे देण्याबाबत सकारात्मक आहे. लोकांना न्याय द्यायचा आहे, कुणालाही बेघर करणार नाही हीच शासनाची भूमिका आहे. सद्यस्थिती ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांचे पुनर्वसन केले जात असून येत्या काळात त्यांना हक्काची घरे देण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी दिली.

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here