पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – शहरासह जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली. पुण्यात सध्या २५१६; तर जिल्ह्यात ८७२५ एवढे रुग्ण सक्रिय आहेत.
पुण्यात ५६९६ एवढ्या चाचण्या गुरुवारी झाल्या आहेत. त्यापैकी शहरात ३३३ जणांना नव्याने करोना संसर्ग झाला असून दोन दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण वाढत आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये २४५; तर ग्रामीण भागात ७६४ नवे बाधित आहेत. जिल्ह्यात एकूण १३४२ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात २५१६, पिंपरी-चिंचवडमध्ये ११४५; तसेच ग्रामीण भागात पाच हजारांहून अधिक रुग्ण सक्रिय असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी १४१ सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासांत प्रत्येकी पाच; तर ग्रामीण भागात १४ अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ६७३ रुग्णांनी प्राण गमावले आहेत.
पुण्यात १८७, पिंपरी-चिंचवडमध्ये २३३ आणि ग्रामीण भागात ६६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत. पुण्यात बधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात १००६ रुग्ण बरे झाले आहेत.






