मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील बोगस लसीकरणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईत बोरिवली, खार, वर्सेवा आणि परेल या ठिकाणीही बोगस लसीकरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत २ हजार ५३ जणांचे बोगस लसीकरण करण्यात आले असून याप्रकरणी चार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत याशिवाय ४०० जणांचे जबाबही रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती राज्य सरकार तसेच पालिकेच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.
लसीकरण स्लॉट उपलब्ध होत नसल्याबद्दल सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी अॅड. अनिता कॅस्टिलिनो यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत घडलेल्या बोगस लसीकरणाची गंभीर दखल घेतली. या रॅकेटने नऊ वेगवेगळय़ा ठिकाणी लसीकरणाची शिबिर घेतली होती याची माहिती मिळताच पालिकेने २३ जून रोजी कांदिवली, बोरिवली, वर्सेवा, खार येथे एफआयआर दाखल केले आहेत.
यापैकी लसीकरणाचे एक शिबिर बोरिवलीत ज्या आदित्य महाविद्यालयात पार पडले तेथील आशिष मिश्रा यांना बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी करण्यात आले आहे तर डॉ. मनीष त्रिपाठी हा आरोपी फरार असल्याची माहिती सरकारने दिली. त्यावर या आरोपींनी जामीनासाठी अर्ज केले आहेत का? अशी विचारणा खंडपीठाने केली. तेव्हा, काही आरोपींच्यावतीने दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले तर काहींचे अद्याप प्रलंबित आहेत. मात्र कुणालाही अटकपूर्व जामीन अद्याप दिलेला नाही असे राज्य सरकार आणि पालिकेच्यावतीने कोर्टाला सांगण्यात आले.






