कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – महाराष्ट्राची सुवर्णकन्या नेहा चौगुले हिची आगामी सबज्युनिअर (पॅडेट) जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. नेहा चौगुले 49 किलो वजनी गटातून सहभागी होईल. बुडापेस्ट (हंगेरी) येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी नवी दिल्ली येथे निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नेहा चौगुलेने दोन शानदार विजय मिळवत स्वतःला सिद्ध केले.
कोल्हापूरच्या नेहा चौगुलेने पंजाबच्या मनप्रीतविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखताना 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तसेच हरयाणाच्या आरतीविरुद्धच्या रोमांचक सामन्यात 4-2 अशी बाजी मारत नेहा चौगुलेने निवड चाचणी स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. या शानदार विजयाच्या जोरावर नेहा चौगुलेने भारतीय संघात स्थान मिळवले.
त्याचप्रमाणे कोल्हापूरच्याच तन्वी मगदूम हिने 53 किलो वजनी गटात लक्षवेधी कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. परंतु या निर्णायक लढतीत हरयाणाच्या अन्तीमविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने तन्वी मगदूमला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. दादासो लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहा चौगुले कुस्तीचा सराव करीत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ललीत लांडगे, संपत साळुंखे यांच्याकडून नेहा चौगुले हिच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.






