अकरावीसाठीची सीईटी जुलैअखेरीस

१०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयावर असतील बहुपर्यायी प्रश्न

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ती असेल. परीक्षा जुलैअखेरीस होईल. १०० गुणांच्या ऑफलाइन सीईटी परीक्षेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली ही परीक्षा आयोजित होणार असून, या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात येईल.

दहावीचा निकाल साधारणत १५ जुलैदरम्यान अपेक्षित असल्याने, त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेच्या आयोजनाची शक्यता आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याप्रमाणे ही सीईटी सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यामुळे इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here