पावणेआठ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त ; गुन्हे शाखा कक्ष ३ ची कारवाई

बडतर्फ पोलीसही करत होता व्हेल माशाच्या उलटीची तस्करी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – समुद्रातील तरंगते सोने वा अंबरग्रीस म्हणून ओळख असलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ केलेल्या पोलिसाचाही समावेश असल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या कारवाईतून उघड झाले. प्रसाद हिराचंद पिंगळे (४४) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून, त्याच्याकडून पावणेआठ कोटींची उलटी जप्त करण्यात आली आहे. पिंगळेला उलटी पुरविणाऱ्या मच्छीमाराचा शोध सुरू आहे.

व्हेल माशाची उलटी – अंबरग्रीस उर्फ समुद्रात तरंगते सोने हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो. याचा वापर अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच, खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. याची खरेदी-विक्री हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. शासनाची बंदी असूनही काही जण याची मोठ्या प्रमाणात तस्करी करतात.

लोअर परळ येथील सीताराम कम्पाउंडमध्ये दोघे जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी बुधवारी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निसर्ग ओतारी, प्रकाश लिंगे, सिद्धेश ज्योष्टे, पोलीस अंमलदार युवराज देशमुख, भास्कर गायकवाड, चंद्रकांत काळे, मंगेश शिंदे, राहुल पाटील यांनी तेथे कारमधून आलेल्या पिंगळेसह अमित विकास पाटील (३६) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ किलो ७५० ग्रॅम उलटी जप्त केली. याची किंमत पावणेआठ कोटी आहे.

दोघेही अलिबागचे रहिवासी आहेत. यातील पिंगळे हा पायधुनी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. तो वैद्यकीय रजेवर गेला हाेता. त्यानंतर ५ वर्षे हजर झाला नाही. त्याला सेवेची गरज नसल्याचे समजून २०१६ मध्ये त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. पिंगळेने मच्छीमार मंगेश नावाच्या तरुणाकडून दोन महिन्यांपूर्वी आक्षी-बेलपाडा फाटा अलिबाग येथून व्हेल माशाची उलटी विक्री करण्याकरिता घेतली होती. तिची विक्री केल्यानंतर पिंगळेने मंगेशला ४० लाख रुपये देण्याचा साैदा ठरला होता. मंगेशचा शोध सुरू आहे.गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून २ कोटी ७० लाखांची उलटी जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here