सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – कोविड पॉझिटिव्हिटी दरानुसार राज्य शासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरामध्ये विभागले आहे. सांगली जिल्ह्यात तिसऱ्या स्तरासाठी निर्धारित केलेले प्रतिबंधात्मक आदेश सध्या लागू आहेत. यानुसार जिल्ह्यात ब्रेक द चेनच्या अनेक निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. तथापि, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कोविड पॉझिटिव्हिटी दर जवळपास १० टक्के व त्यापेक्षाही जास्त होत आहे. सदरची बाब गंभीर असून अशी स्थिती राहिल्यास महानगरपालिका क्षेत्रात ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करावे लागतील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाचे संकट पूर्णत: टळलेले नसून दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. सांगली जिल्हा १४ जूनपासून तिसऱ्या स्तरात आला असून त्यामुळे तिसऱ्या स्तरात अनेक बाबतीत निर्बंधांबाबत शिथीलता देवून व्यवहार सुरू करण्यात आलेले आहेत. जनजीवन हळूहळू सुरळीत होत असतानाच गेल्या दोन – तीन दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढती आहे. नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढून मिळालेली निर्बंधामधील शिथीलता गमवावी लागेल.
हे टाळायचे असल्यास योग्य सामाजिक अंतर पाळावे, गर्दी टाळावी, लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, संबंधित यंत्रणांनीही कोविड पॉझिटिव्हिटी दर आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.






