‘मॅकॅफी अँटीव्हायरस’चे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचा स्पेनमध्ये संशयास्पद मृत्यू

न्यूयॉर्क – प्रसिद्ध अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’चे जनक जॉन मॅकॅफी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. स्पेनमधील तुरुंगात त्यांचा मृतदेह आढळून आला. स्पेनच्या न्यायालयाने त्यांच्या अमेरिकेकडे प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच मृतदेह आढळल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली.

मॅकॅफी यांनी २०१४ ते २०१८ या कालावधीत कर चुकविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इस्तंबूलला विमानाने जात असताना बार्सिलोना विमानतळावर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांना स्पॅनिश पोलिसांनी अटक केली होती. अमेरिकेने त्यांना फरार घोषित केले होते. अमेरिकेने नोव्हेंबर २०२० मध्ये स्पेनकडे प्रत्यार्पणासाठी विनंती केली होती. त्यात मॅकॅफी यांनी चार वर्षांमध्ये १० दशलक्ष युरो एवढी कमाई केली असून, त्यावर प्राप्तिकर भरलेला नसल्याचा उल्लेख करण्यात आला होता. स्पेनमधील न्यायालयाने ही विनंती मान्य करून प्रत्यार्पणाची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय तुरुंग प्रशासनाने व्यक्त केला आहे.

७५ वर्षीय जॉन मॅकॅफी यांनी १९८७ मध्ये ‘मॅकॅफी कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीची संगणकांना संरक्षण देणाऱ्या अँटीव्हायरस क्षेत्रात अनेक वर्षे मक्तेदारी होती. त्यानंतर इंटेल कॉर्पोरेशनने २०१० मध्ये त्यांची कंपनी विकत घेतली होती. ‘मॅकॅफी’ हे अँटीव्हायरस लाँच करण्यापूर्वी त्यांनी नासा, झेरॉक्स, लॉकहीड मार्टीन यासारख्या संस्थांमध्ये काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here