उपयुक्तता संपल्याने बाजूला करत असल्याची भाजपाच्या वर्तुळात कुजबुज
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्रात युतीचे सरकार असतांना वेळोवेळी आलेल्या संकटातून युती सरकारला तारुन नेणारे भाजपाचे संकटमोचक म्हणून प्रसिध्द असलेले माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक पक्षातर्फे बाजूला सारण्यात येत असल्याची कुजबुज भाजपाच्या वर्तुळात सुरु झालीय. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील शेतकरी आंदोलन असो वा अण्णा हजारेंचे आंदोलन गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने सरकारला तारले होते, म्हणूनच त्यांचा चेहरा भाजपा सरकारचे संकटमोचक म्हणून सदैव पुढे रहात असे.
सध्या बी.एच.आर. प्रकरणात गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय कारवाईची छायेखाली आहेत. त्यातच महाजनांच्या वर्चस्वाखालील जळगाव मनपात भाजपाचे नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले, त्यामुळे महानगरपालिकेतील सत्ता भाजपाच्या हातातून गेली, धुळ्यातही जवळपास तशीच परिस्थिती आहे. सत्ता गेल्यापासून सातत्याने महाजनांच्या शिष्टाईला येत असलेले अपयश पाहून राज्य नेतृत्वाने जयप्रकाश रावळ यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची सूत्रे दिलीत. यापुढे रावळ यांचाच शब्द अंतिम असेल असे सुतोवाचही करण्यात आले.
आताही ओबीसी आरक्षण संदर्भात राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत असतांना जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षाताई खडसे यांनी करावे अशा सूचना आहेत. या सर्व घडामोडींमधून आमदार गिरीश महाजनांना पक्षातर्फे प्रमुख भूमिकांपासून बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना शह देण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना जाणीवपूर्वक बळ दिले. आता खडसे पक्षाबाहेर गेलेत आणि भाजपाची राज्यातील सत्ताही गेली त्यामुळे गिरीश महाजनांची उपयुक्तता फडणवीस आणि इतर पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने कमी झाली आहे.
गेल्या चार वर्षात प्रत्येक आंदोलन असो वा कार्यक्रम पक्षाचे नेतृत्व जिल्ह्यात गिरीश महाजनांनी केले आहे. त्याबाबतचे सर्व निर्णयही त्यांनीच घेतले आहेत. असे असतांना राज्यात महत्वाचे समजले जाणाऱ्या ओबीसी आंदोनाचे नेतृत्व पक्षाकडून खासदार रक्षाताई खडसेंकडे दिल्यामुळे या सर्व घडामोडीतून आमदार गिरीश महाजन यांना साईडट्रॅक केले जात असल्याची कुजबूज पक्षात सुरु झाली आहे.






