मडगाव राजधानी एक्सप्रेसचे चाक रुळावरून उतरले

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – हजरत निजामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेसचे चाक रुळावरून उतरले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील भोके आणि उक्षी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या मार्गावर पडलेल्या बोल्डरमुळे ही दुर्घटना झाल्याचे कळते आहे. या दुर्घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. शनिवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या मार्गावर अडकलेली एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ करण्यासाठी कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी इंजिन मार्गावर आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या गाडीचे चाक रुळावरून उतरल्याने त्यामागून येत असलेल्या गाड्या विविध स्थानकात थांबल्या आहेत.

सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये. तसेच गाडीचे सर्व डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात या मार्गावरील रेल्वेगाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here