‘पीएमसी बँके’वर डिसेंबरपर्यंत आरबीआयचे निर्बंध

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – बिगर बँकिंग वित्त संस्था नियंत्रणात घेऊ पाहणाऱ्या ‘पीएमसी बँके’वरील (पंजाब अँड महाराष्ट्र बँक) निर्बंध डिसेंबर २०२१ पर्यंत विस्तारण्यात आले आहेत. सेंट्रम फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसला सहकारी बँक खरेदी प्रक्रिया पार पाडता यावी यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने ‘पीएमसी बँके’वरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत.

मार्च २०२१ अखेर सहकारी बँकेतील ठेवींची रक्कम १०,७२७.१२ कोटी रुपये तर कर्ज वितरण ४,४७२.७८ कोटी रुपये आहे. बँकेची ढोबळ अनुत्पादित मालमत्ता ३,५१८.८९ कोटी रुपये आहे.

एचडीआयएल या विकासक कंपनीला दिलेल्या कर्ज घोटाळा प्रकरणातील ‘पीएमसी बँके’वर रिझव्‍‌र्ह बँकेने सर्वप्रथम २३ सप्टेंबर २०१९ मध्ये कारवाई केली होती. असे करताना तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त करण्यासह बँकेच्या खातेदारांवर रक्कम काढून घेण्यावरही मर्यादा घाली होती. सुरुवातीला १,००० रुपयेपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी नंतर एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली.

‘पीएमसी बँके’साठी स्वारस्य दाखवणाऱ्यांची प्रक्रिया नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आली. आठवडय़ापूर्वीच सेंट्रम फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचा याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी आवश्यक लघू वित्त बँक स्थापन करण्यास सेंट्रमला परवानगी मिळाली. सेंट्रमसह भारतपे या नवागत बँकेद्वारे १,८०० कोटी रुपयांचे भांडवल ‘पीएमसी बँकेत जमा करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here