मुंबई विमानतळावर ७ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर कारवाई करून सुमारे ७ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त केले आहे. कोकेनची तस्करी करणाऱया इमाईल मुलिंडे या महिलेला डीआरआयने अटक केली. गेल्या पंधरा दिवसांतील डीआरआयची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

मूळची झांबिया देशाची रहिवासी असलेल इमाईल ही गुरुवारी अडिस अबादा येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. विमानतळावर आल्यावर डीआरआयच्या अधिकाऱयांनी बॅगेज सेक्शन येथे इमाईलच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा तिच्या बॅगेत एक पिशवी आढळून आली. त्या पिशवीतून ७०० ग्रॅम कोकेन डीआरआयने जप्त केले.

जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे ७ कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे. इमाईलला ते कोकेन अडिस अबादा विमानतळावर एका व्यक्तीने दिले होते. मुंबई विमानतळावर आल्यावर ती कोकेनची पिशवी एका व्यक्तीकडे देण्यास तिला सांगितले होते. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात तिला काही रक्कम मिळाली होती. डीआरआयने इमाईलचा एनडीपीएस कायद्यानुसार जबाब नोंदवून तिला अटक केली. तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

परदेशातील ड्रग्ज तस्कर हे तस्करीसाठी महिलांचा वापर करत आहेत. इमाईल ही ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीतील एक आहे. महिला या शरीरातून किंवा बॅगेतून ड्रग्ज घेऊन मुंबईत येतात. गेल्याच आठवडय़ात डीआरआयने झांबिया देशाची रहिवासी असलेल्या महिलेला अटक करून तिच्याकडून तीन किलो हेरॉईन जप्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here