कोविड-१९ लसीकरणात अमेरिकेला मागे टाकत भारताने गाठला नवा मैलाचा टप्पा

  • गेल्या २४ तासात ४६,१४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती ५,७२,९९४ वर पोहचली.
  • भारताच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने पार केला ३२.३६ कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला १४ डिसेंबर २०२० रोजी प्रारंभ झाला आहे.

भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल ३२.३६ कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. आज सकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार ४३,२१,८९८ सत्रांमध्ये, एकूण ३२,३६,६३,२९७ लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात १७,२१,२६८ लसी देण्यात आल्या.  कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला २१ जून २०२१ रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे.

भारतात गेल्या २४ तासात ४६,१४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग २१ दिवस १ लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.  भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या ५,७२,९९४ इतकी आहे. गेल्या २४ तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण १३,४०९ इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ १.८९% सक्रीय रुग्ण आहेत.

कोविड -१९ संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग ४६ व्या  दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात ५८,५७८ रुग्ण बरे झाले.  दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासात जवळपास, १२ हजार ३४० रुग्ण बरे झाले.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण २,९३,०९,६०७ तर गेल्या २४ तासात ५८,५७८ रुग्ण कोविड-१९ संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर ९६.८०% झाला आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात १५,७०,५१५ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण ४०.६३ कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी २.८१% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी २.९४% आहे. सलग २१ व्या दिवशी हा ५% पेक्षा कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here