स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत साकारली होती खाशाबाची व्यक्तिरेखा
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील अभिनेता उज्ज्वल धनगर याचं आज निधन झालं. उज्ज्वलनं वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीच अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान उज्ज्वलचं निधन झालं. उज्ज्वलनं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत खाशाबा ही व्यक्तीरेखा साकारली होती. याच व्यक्तीरेखेनं त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली होती.
अभिनेता उज्ज्वल धनगर हा मूळचा शहापूर तालुक्यातील सापगावचा रहिवासी होता. पण मागची १५ वर्ष तो टिटवाळा येथे राहत होता. उज्ज्वलनं केवळ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेतच नाही तर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय त्यानं ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. एक अभिनेता असण्यासोबतच उज्ज्वल एक उत्तम निवेदकही होता. त्यानं अनेक कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. उज्ज्वलच्या अशा अकस्मित निधनानंतर त्याच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.
उज्ज्वलनं शनिवारी ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी शोचं शूटिंग पूर्ण केलं त्यानंतर त्यानं नगरसेवक संतोष तरे यांच्यासोबत रविवारी रात्री जेवणही केलं. पण सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाल्यानं तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातील अॅसिडिटी झाल्याचं समजून त्याची औषधं घेऊन तो घरी परत आला मात्र नंतर त्रास वाढत गेल्यानं त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तेव्हा उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.






