पटियाला : भारताची स्टार स्प्रिंटर हिमा दास हिच्यासाठी टोकियो ऑलिंम्पिकसाठी पात्र होण्यासाठी पटियाला येथील आंतरराज्य स्पर्धा ही शेवटची संधी होती. पण हिमा दसला या स्पर्धेत दुखापत झाल्याने तिचे टोकियो ऑलिंम्पिकचे स्वप्न भंगले आहे. टोकियो ऑलिंम्पिकची पात्रता फेरी २९ जून पर्यंतच होती. याच दरम्यान पटियालामध्ये आंतरराज्य अॅथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारताची स्टार स्प्रिंटर हिमा दास हिच्यासाठी ही ऑलिंम्पिक तिकीट मिळवण्याची शेवटची संधी होती.
पण, १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेवेळी २१ वर्षाच्या हिमा दासचा मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे तिला ही स्पर्धा १२.१ सेकंदात पूर्ण करत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. टोकियो ऑलिंम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी ११.१५ सेकंदात ही शर्यतपूर्ण करणे गरजेचे होते.
दुखापत झाल्यामुळे हिमा दासला १०० मिटर फायनल मधून बाहेर पडावे लागले. याचबरोबर ती ४ बाय १०० मिटर महिला रिले संघातूनही बाहेर रहावे लागले. हिमा दासच्या अनुपस्थितीत रिलेचा संघ द्युती चंद, एके दानेश्वरी, अर्चना सुसिंदरन आणि धनलक्ष्मी सेकर यांना ऑलिंम्पिक पात्रतेचा बेंचमार्कही गाठता आला नाही. या चौघींनाही टोकियो ऑलिंम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी ही शर्यत ४३.०३ सेकंदात पूर्ण करणे गरजेचे होते. पण, या चौघींच्या संघाने ४४.१५ सेकंदात शर्यत पूर्ण केली. या चौघींनीही या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले पण, ऑलिंम्पिकचे तिकीट मिळवता आले नाही.
हिमा दास हिला अजूनही बाहेरून टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. जर अॅथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने तिचे नाव मिश्र ४ बाय ४०० मिटर शर्यतीच्या संघात समाविष्ट केले तर तिचे टोकियोचे तिकीट नक्की होईल. पण, आधी तिला दुखापतीतून सावरावे लागेल. सध्या हिमा दासच्या नावावर ४०० मिटर महिलांमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे.






