पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : महापालिका हद्दीलगतच्या २३ गावांच्या समावेशावर राज्य शासनाने बुधवारी शिक्कामोर्तब केले. पुणे महानगरपालिका क्षेत्राच्या सीमात फेरफार करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये काही क्षेत्रे समाविष्ट करण्याचं म्हटलं होतं. त्यानुसार सर्व हरकती आणि सूचनांचा शासनाने विचार करत २३ गावांचा पुणे मनपात समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता या निर्णयामुळे पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २३ गावाच्या समावेशाची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती. त्यानुसार राज्य शासनाने गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी २३ गावांच्या समावेशाची अधिसूचना काढली आहे. त्यावर हरकती-सूचना मागविण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर जवळपास साडेचारशे हरकती आल्या होत्या. या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांनी त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यावर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत गावांचा समावेशाचा निर्णय निश्चित करण्यात आला. त्यानुसार आज बुधवारी नगरविकास खात्याने गावांच्या समावेशाचे आदेश काढले आहेत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही आता चालू होणार आहे. या निर्णयावर कृती समितीने स्वागत करत म्हटलं, हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट २३ गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे. पुणे शहर हे आता ख-या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर झाले आहे.
ही २३ गावे होणार समाविष्ट –
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. किती सदस्यांचा प्रभाग करायचा, यासंबंधीचा निर्णय झाल्यानंतर प्रभागरचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आधी २३ गावांचा समावेश महापालिकेत होणे गरजेचे होते. त्यामुळेच आता गावांची समावेशाचा निर्णय घेतला असल्याचे स्पस्ट होत आहे.






