जप्त सोन्याच्या दागिन्यावर पोलिसाचा डल्ला, नगरच्या कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर (प्रतिनिधी) : नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेला सोन्याचा मुद्देमाल एका पोलीस कर्मचाऱयाने खासगी फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवून त्यापोटी 5 लाख 40 हजार 640 रुपये घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित पोलिसावर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश शिंदे असे या पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी फिर्याद दिली. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करून पोलिसांनी सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. सदरचा मुद्देमाल हा नंतर पोलीस ठाण्यातील कारकून यांच्याकडे ठेवण्यात येतो. नंतर तो न्यायालयात सादर केला जातो, परंतु पोलीस गणेश शिंदे याने स्वतःच्या फायद्यासाठी सदरचा सोन्याचा मुद्देमाल एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवून 5 लाख 40 हजार 640 रुपये घेतले.

याप्रकरणी त्याने न्यायालयाच्या आदेशाचीही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच संबंधित आरोपी याने अजून काही रक्कमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here