‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेचं न्यूड फोटोशूट

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आपलं शरीर ही देवाने दिलेली देणगी असते, असं मानलं जातं. पण एखाद्याच्या शरीरात काही व्यंग असेल तर मात्र त्याच्याकडे सहानुभूतीच्या किंवा तिरस्काराच्या नजरेने पाहिलं जातं. परंतु, आमचं शरीर जसं आहे तसंच ते आम्हाला आवडतं असं ठामपणे सांगण्याची हिम्मत फार कमी जणांमध्ये असते. काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट करत प्रेक्षकांची झोप उडवली होती. वनिताच्या शरीराबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींची तिने बोलती बंद केली होती. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने वनिताच्या पावलावर पाऊल ठेवत प्रेक्षकांना त्याच्या शरीराकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे.

दमदार कथानकातून आणि नवख्या तरीही उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयातून तयार झालेला ‘सैराट’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटातील लंगड्याचं पात्र साकारणारा तानाजी गळगुंडे चांगलाच गाजला होता. तानाजी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तानाजीने नुकतंच न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं. या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे. तानाजीचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. परंतु, हे फोटोशूट करण्यामागचं कारणही तानाजीने स्पष्ट केलं. तानाजीच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, ‘माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!’

तानाजीने इतरांच्या शरीराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या फोटोतून देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी वनिताच्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता तानाजीचा फोटोदेखील नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here