भारत – इंग्लड कसोटी मालिकेतून बुमराहला वगळणार

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत भारतीय संघाच्या निवड समितीने दिले आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अंजिक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत बुमराहला एकही बळी घेता आला नव्हता. तसेच यंदाच्या मोसमातही त्याला दर्जानुरूप कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वगळण्यात येणार असल्याचेही वर्तवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासून बुमराहला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या दौऱ्यात बुमराहलाही डच्चू मिळू शकतो. पण बुमराहला जर कसोटी संघातून डच्चू दिला तर त्याच्या जागेसाठी तीन पर्याय समोर आले आहेत.

शार्दुल ठाकूर, उमेश यादव व महंमद सिराज या तीनपैकी एका गोलंदाजाला संघात स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. त्यातही यादवपेक्षा ठाकूर व सिराज यांचे सातत्य व उपयुक्‍तता पाहता याच दोघांमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा होणार आहे.

सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये १६ गडी बाद केले होते. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील डावात त्याने पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली होती. सिराजकडे चांगला वेग आहे आणि तो चेंडू स्विंगही करू शकतो. त्यामुळे इंग्लंडमध्येही सिराज चांगली गोलंदाजी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here