उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव

दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन पत्रकार परिषदेत दिली माहिती

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. काल (शुक्रवार २ जुलै २०२१) संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. आज (शनिवारी) उत्तराखंडच्या भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढे काय करायचे याचा निर्णय होणार आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री झाले. उत्तराखंडच्या पौडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नियमानुसार त्यांना १० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक जिंकणे आवश्यक होते. राज्यात फेब्रुवारी-मार्च दरम्यान गंगोत्री आणि हल्द्वानी येथे पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक आधी घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. पण पोटनिवडणूक होणार नसल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा देणे हाच पर्याय उपलब्ध आहे.

नियमानुसार मुख्यमंत्री राजीनामा दिल्यानंतर पुन्हा शपथ घेणार असतील तर त्यांना निवडणूक लढवण्यासाठी नव्याने सहा महिन्यांचा कालावधी मिळेल. पण राज्यातील राजकीय स्थिती बघता रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजप राज्यातील नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदी संधी देण्याची शक्यता आहे. तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद कोणाला दिले जाईल यावरुन चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या चार आमदारांची संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चा होत आहे.

संभाव्य मुख्यमंत्री
धन सिंह रावत – धन सिंह रावत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. ते उत्तराखंडच्या श्रीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात येण्याआधी ते संघाचे स्वयंसेवक होते. उत्तराखंड भाजपचे संघटनमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. ते मूळचे पौडी गढवालचे आहेत. त्यांनी डबल एमए आणि पॉलिटिकल सायन्सची पीएच डी मिळवली आहे.

बंशीधर भगत – उत्तराखंड सरकारमध्ये सध्या कॅबिनेटमंत्री असलेले बंशीधर भगत कालाढूंगीचे आमदार आहेत. त्यांनी आधी उत्तर प्रदेश सरकारमध्ये आणि नंतर उत्तराखंड सरकारमध्ये सातत्याने वेगवेगळी मंत्रीपदे प्रभावीरित्या सांभाळली आहेत.

हरक सिंह रावत – हरक सिंह रावत उत्तराखंडचे आयुष और आयुष शिक्षा खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. साधारण दिड महिन्यांपूर्वी राज्यातील कोरोना संकटाची माहिती देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

सतपाल महाराज – उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. त्यांनी उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक खासदार आणि केंद्रीयमंत्री म्हणून त्यांनी उत्तराखंडच्या निर्मितीसाठी तत्कालीन केंद्र सरकारवर दबाव टाकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ते २१ मार्च २०१४ रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here