सतपाल महाराज, हरक सिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश
डेहराडून : पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत सतपाल महाराज, हरक सिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तसेच वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह आणि सुबोध उनियाल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.
धामी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याने सतपाल महाराज नाराज झाले होते. त्यामुळे पदाची शपथ घेण्यापूर्वी धामी यांनी सतपाल महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सतपाल महाराजही मंत्रिमंडळात येण्यास तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.






