कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) : आजरा तहसिल कार्यालयातील उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहलिदार (महसूल) संजय श्रीपती इळके (वय ५२) व तलाठी राहूल पंडीतराव बंडगर (३३) यांना तब्बल ७५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. याबाबतची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख युवराज शामराव पोवार यांनी दिली होती.
याबाबत माहिती अशी की, युवराज पोवार यांनी वर्ग दोनची जमिन वर्ग एक करण्याकरिता तहसिल कार्यालयाकडे प्रस्ताव ठेवला होता. याकामासाठी इळके व बंडगर यांनी त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार पोवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर सोमवारी सकाळी सापळा रचून इळके व बंडगर यांना पैसे स्विकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणाने महसूल विभागात खळबळ उडाली.
बहुतांशी अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयाबाहेरच राहणे पसंत केले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, पो. कॉ. अजय चव्हाण, पो. नाईक सुनील घोसाळकर व पो. कॉ. रुपेश माने यांच्या पथकाने सदर कारवाई केली.






