शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

आंदोलनाने महसूल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी ठ दिवस आंदोलन केल्यावर कोणीच दखल घेतली नाही. या निषेधार्थ रिंगरोड व रेल्वे विरोधी आंदोलनातील कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. मंगळवारी (दि. ६) पहाटे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केल्याने, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १२ गावांतून पुणे नाशिक रेल्वे आणि रिंग रोड प्रकल्प होणार आहे. या गावांच्या शेतकरी प्रतिनिधींनी मंगळवार (दि २९) पासून प्रांत कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी वाचन करून चक्री उपोषण आंदोलन सुरू केले होते. गेल्या आठ दिवसांत या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नाही. खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा त्यात समावेश आहे.

पोलीस अटकाव करतील म्हणून पाटीलबुवा गवारी हे पहाटे अंधारात येऊन टाकीवर चढून बसले. सकाळ झाल्यावर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, राजगुरूनगर शहरातील नागरिकांनी आंदोलन स्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक निरीक्षक अरुण लाड व पोलीस या ठिकाणी उपस्थित होते. अनेक विनंत्या करून देखील पाटिलबुवा गवारी खाली आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here