बापाचे महत्व व परिवाराबद्दल जबाबदारी

सय्यद गुलाम हुसैन । लखनऊ उत्तर प्रदेश
राञभर त्याचं पोट दुखत होतं.. अंगात कणकण होती.. तो आदल्या राञी नीट जेवलाही नव्हता.. सारखं या कुशीहून त्या कुशीवर.. तळमळ तळमळ सुरू होती.. त्याच्या बायकोने विचारलं खूपच दुखतंय ना..?? त्याने कसनुसं तोंड करून हो अशी मान हलवली.. ती म्हटली परसाकडं जावून या.. तो म्हटला नाही तसं काही नाही.. मग तिने हलक्या हाताने त्याच्या पोटाला हिंग लावलं.. तो म्हटला कंदील विझव.. पोरं उठतील उगीच त्यांची झोपमोड नको.. ती म्हटली किती दिवस अंगावर काढणार.. आता तालुक्याला मोठ्या दवाखान्यात जायला पाहिजे.. असं करू उद्याच जाऊ तालुक्याला.. तो म्हटला अगं उद्या पाटलाच्या घरी पूजा आहे.. जी पडतील ती कामं करायला त्यांनी मला बोलवलय… अहो नका जाऊ तुम्हाला बरं नाही.. तो थोडं हसला आणि बाजूलाच झोपलेल्या त्यच्या तीन मुलांच्या तोंडाकडे पाहिलं.. मोठी मुलगी सहावीला मधला मुलगा चवथीला आणि धाकट्याला नुकतंच पहिलीत घातलेलं.. तो बायकोला म्हटला झोप आता मला काही होत नाही.. उद्याचं उद्या बघू.. ती हो ना करता करता त्याच्या बाजूला पडली.. दोन मिनिटांत ती झोपली.. तिचा जीव सुद्धा मेहनती.. राबराब राबणारं कष्टक-यांचं सर्वसामान्य गरीब कुटुंब.. त्याला काही केल्या झोप येईना पोटात चांगलच दुखत होतं.. त्याने पोटाला घट्ट उपरणं बांधलं.. अंधारातही त्याची नजर त्याच्या अश्राप पोरांच्या चेहऱ्याकडे जात होती.. दिवाळी तोंडावर आलेली.. लोकांच्या शेतात कापणी झोडणी आणि अशी बरीच कामं सुरू होती.. मुलगी म्हटलेली बाबा यावेळी तरी मला दिवाळीत नवा फ्राॕक घेशीन ना ? माझ्या शाळेतल्या सगळ्या मुली छान छान कपडे घेतात दिवाळीत.. दोन नंबरचा मुलगा म्हटला बाबा मला चप्पल घे ही चप्पल चार पाच वेळा शिवली..या चपलेत काहीच राहीलं नाही आता.. आणि सगळ्यात धाकडा म्हटला बाबा मला पिस्तुल आणि टिकल्या पाहिजेत दिवाळीत उडवायला.. बायको म्हटली मला काहीच नको यावेळी पोरांची तरी दिवाळी चांगली झाली पाहिजे.. पोरांना करंज्या चिवडा आणि रव्याचे लाडू आवडतात.. थोडं थोडं सामान आणून दिलं तर मी बनवून घालीन पोरांना खायला.. त्याला सगळं आठवत होतं.. माझी पोरं लहान आहेत पण समंजस आहेत.. त्यांना बापाची परिस्थिती समजते म्हणून कधीच कसलाच विशेष हट्ट करीतच नाहीत.. कसला बाप म्हणायचं मला.. मी पोरांना साधा खोडरबरही घेऊन देऊ शकत नाही वेळच्या वेळी.. माझ्या लेकीने जाड टायरचे तीन तुकडे कापून खोडरबर केला.. त्याचे डोळे भरले.. सालं मी बाप म्हणवून घेण्याच्या खरच लायकीचा नाही का..? आजवर बायकोची एकही हौस केली नाही तिच्या अंगावरची हळद निघण्या आधी मी तिला शेतात मोलमजुरीला नेलं.. प्रामाणिकपणे इतकी मेहनत करूनही मी पोरांना चांगालं खायला प्यायला देऊ शकत नाही.. त्याला गावची जञा आठवली.. इतर मुलांनी किती मिठाई खाल्ली.. त्यांचे बाप तालेवार आहेत.. आणि मी कशीबशी पोरांना कांदाभजी खाऊ घातली.. बारक्याला आकाश पाळण्यात बसायचं होतं.. पण पण माझ्याकडे पैसेच उरले नसल्याने मोठ्या मुलीने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं.. तो मला म्हटला बाबा नको मला आकाश पाळणा.. मी बसेल आपल्या दारात बांधलेल्या लिंबाच्या झाडाच्या झोक्यावर.. खरं सांगतो मला धाकट्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडसच झालं नाही.. खरंच गरीबांच्या पोरांना कुठून येत असेल एव्हडी समज.. त्याला सगळं सगळं आठवू लागलं.. गारेगार गोळ्यावाला गावात आलेला.. शेजारच्या पोरांनी रंगीबेरंगी बर्फाचे गोळे घेतले.. बारक्याला पाहिजे होता गोळा पण घरात त्यांच्या आईकडे पैसे नसल्याने मुलीने त्याच्या डोळ्यावर हात ठेऊन त्याला घरात ओढत नेलं.. खूप रडलेला बारका.. मग मुलीने त्याला राजा राणीच्या लग्नाची गोष्ट सांगितली.. त्या गोष्टीत पंचपक्वान्न जेवणाचा उल्लेख आला.. मुलगी मनलावून गोष्ट सांगत होती.. बारक्याने तिला विचारलं ताई तू सांगते ती बर्फी कशी लागते ग ? मला भेटेल का कधी खायला ?? आता मोठी मुलगीही रडवेली झाली.. त्याच्य तोंडावर हात फिरवत ती म्हटली का नाही मिळणार.. मी देईल.. आणि बाबा नेहमी म्हणतो ना आपल्याला शिकून लवकर लवकर मोठे व्हा.. चांगल्या कामाला लागा मग तुम्हाला कधीच अर्धपोटी झोपावं लागणार नाही.. धाकटा परत बोलला ताई पण तू खरंच देशील ना ग मला ती बर्फी खायला.. हो हो रे बाबा देईल.. अगोदरच बर्फाच्या गोळ्यासाठी खूप रडलेला धाकटा लेक बर्फी खायला मिळणार या आनंदातच झोपी गेला..
सगळं सगळं आता त्या बापाला आठवत होतं.. मला कितीही ञास झालातरी चालेल. पण मुलांना शिकवायचंच.. त्याची नजर बाजूला शांत झोपलेल्या बायकोकडे गेली.. तो मनाशीच म्हटला.. सर्वात दुर्दैवी आहे ही बाई.. दिसायला चांगली गोरीपान होती.. हिलातरी चांगला तालेवार नवरा भेटायला पाहिजे होता.. परत त्याची नजर धाकट्या लेकाकडे गेली.. त्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.. त्याची चुळबूळ झाली.. याने पुन्हा हात मागे घेतला आणि पोरांकडे बघतच झोपी गेला..
सकाळ झाली.. बायकोने त्याला उठवलं.. अहो उठा.. कसं आहे आता पोटाचं दुखणं.. तो म्हटला थांबलय थोडं.. अहो जाऊना आपण तालुक्याच्या डाॕक्टरकडे.. पैसे नाहीत ग माझ्याकडे.. अहो मी माझं डोरलं गहाण ठेवते.. काहीही नको बोलू तो म्हटला.. अहो त्या डोरल्यापेक्षा मला तुम्ही महत्त्वाचे अहात.. तो म्हटला जाऊ जाऊ दोन दिवसांनी मला आवरूदे लवकर आज पाटलाची पूजा आहे.. मला बोलवलय कामाला.. बायको काही बोलण्याच्या आत तो अंघोळीला गेला.. अंघोळ उरकल्यावर तो शर्ट घालू लागला.. ती म्हटली अहो किती फाटलय ते शर्ट.. सगळ्यांचं राहूदे आधी तुम्हाला एक शर्ट घ्या.. तो हसला.. तिने दिलेल्या को-या चहात अर्धी शिळी भाकर बुडवून खाल्ली आणि तिला म्हटला येतो मी.. तो जाता जाता ती म्हटली लाकडं फोडण्याचं काम असेल तर नका करू राञभर तुमचं पोट दुखत होतं.. तो हसला आणि निघून गेला.. तिने पोरांना उठवलं.. थोरल्या मुलीला सांगितलं टोपल्यात दोन भाकरी आहेत तुम्ही तिघे वाटून घ्या आणि खा.. तीही लोकांच्या शेतात कामाला गेली..
इकडे पाटलाच्या वाड्यावर याला लाकडं फोडायला लावली.. पोट पुन्हा जोराने दुखू लागलं.. याने पोटाला पुन्हा घट्ट उपरणं बांधलं.. आणि काम करू लागला.. कसंबसं काम आवरल्यावर आणि सगळी पाहुणे मंडळी जेवून गेल्यावर या गडी माणसांची पंगत बसली.. याला खूपच मळमळायला लागलं.. तो उठून बाजूला गेला आणि भडाभड उलट्या केल्या अंगाला दरदरून घाम फुटलेला.. थोडावेळ डोळे बंद करून बसला थोडं बरं वाटल्यावर आचा-याकडे गेला… दादा माझी तब्येत बिघडलीय मला वाढून देता का माझं जेवण.. आचारी चांगला होता.. याला ओळखत होता याची परिस्थिती जाणत होता.. त्याने ब-यापैकी जेवण वाढून दिलं त्यात जिलेबी आणि पु-या पाहून आज मुलं खूश होतीय या आनंदाने क्षणभर का होईना तो आनंदला.. इतक्यात पाटलीन बाई आली तिने याला तीनशे रूपये दिले.. हा मनातूनच खूश झाला.. आज शंभर रूपये जास्त मिळाले असं तोंडातल्या तोंडात पुटपुटला.. घरी आल्यावर मुलांनी याच्या हातातल्या पिशवीकडे पाहिलं आणि विचारलं.. बाबा काय आणलं ? पाटलाने खाऊ दिलाय का मधला मुलगा बोलला.. मुलगी आणि बायको शांतच होती.. धाकटा उड्या मारत मारत जवळ आला.. बाबा बर्फी आणलीय का ? तो म्हटला बाळा बर्फीही आणेल तुला.. आगोदर ही गोड गोड जिलेबीतर खा… तिन्ही मुलं पटापट पंगतीने खाली बसली.. बायकोने विचारलं आणि तुम्ही हो.. मुलं बापाच्या तोंडाकडे पाहू लागली.. त्याने बळेबळेच जोराचा ढेकर दिला आणि म्हटला मी दाबून जेवलोय पाटलाकडे.. हे तुमच्यासाठीच आणलय.. बायकोला ठाऊक होतं.. ती काही बोलण्याच्या आत याने तिला नजरेने शांत केलं.. धाकट्याच्या वाट्याला जिलेबीचा दीड तुकडा आला.. तो दोन्ही हातात जिलेबी घेऊन आनंदाने उड्या मारून जिलेबी खाऊ लागला.. आज मुलं खूपच खूश होती..धाकटा तर बापाच्या कुशीतच झोपला..
दिवसभर लाकडं फोडल्याने याचं पुन्हा राञभर पोट दुखलं… सकाळी मात्र याच्या बायकोने शेजारच्या दोन बायांकडून उसने पैसे घेऊन याला तालुक्याच्या दवाखान्यात धाडले.. तीही जात होती पण याने मिञाला सोबत नेतो असं सांगितलं व मग दवाखान्यात गेला.. संध्याकाळ होत आली तरी याचा पत्ता नाही.. मुलांनी दहावेळा विचारलं आई बाबा कसा आला नाही गं अजून ती म्हटली येईल बाबा.. नका काळजी करू.. राञी नवच्या शेवटच्या एसटीने हा आला.. हातातल्या पिशवीत औषधं होती.. आता माञ आम्हाला काय आणलय असं मुलांनी विचारलं नाही.. बापाची तब्येत बरी नाही हे त्या लहानमुलांनाही कळत होतं.. मोठीने विचारलं बाबा थांबलं का पोट.. मधल्याने पाणी आणून दिलं तर धाकटा म्हणाला बाबा तुझ्या पोटाला मी हिंग लावून देऊ का तू लगेच बरा होशील.. त्याचे डोळे भरले…पण कंदीलाच्या कमी प्रकाशात ते मुलांच्या लक्षात आलं नाही.. याने कशीबशी अर्धी भाकर खाल्ली गोळ्या घेतल्या.. बायको सारखं तब्येतीचं विचारीत होती.. पण काय नाय ग होईल मी बरा असं म्हणून त्याने तिला गप्प केली.. पहाट झाली पण आज याच्या अंगात ञाणच उरले नाही.. त्याने चार वेळा उठण्याचा प्रयत्न केला..पण त्याला जमेनाच… जबरदस्त ताप भरला… चार दिवस झाले.. आठ दिवस झाले.. याने पेज जरी घेतली तरी उलटी व्हायची पोटात काहीच टिकत नव्हतं.. शेजारच्या गावातला डाॕक्टर आणला तो म्हटला मुंबईला घेऊन जा यांना… बायकोची कंबरच खचली.. मुलं कावरीबावरी झाली… आता याला बोलणंही जड जावू लागलं.. तिने याच्या भावा बहिणीला आणि तिच्या स्वतःच्या भावालाही सांगावा धाडला.. असेल तसे निघून या यांची तब्येत जास्त झालीय.. सकाळीच हिचा भाऊ आणि त्याचेही नातेवाईक आले.. हिचा भाऊही परिस्थितीने गरीबच.. पण त्याला आपली बहीण आपल्यापेक्षा गरीब असल्याची जाणीव होती.. पोटापुरता एकुलता एकच असलेला शेताचा तुकडा गहान ठेऊन त्याने बहिणीसाठी पैसे आणलेले.. आता दिवाळी दोन दिवसावर आली प्रत्येक जण आपापल्या परीने खरेदी करीत होता.. चिवडा चकल्या लाडूचा आजूबाजूच्या घरांतून वास येत होता.. काही मुलं फटाके फोडत होती.. काही नागगोळ्या खेळत होती.. धाकटा दाराच्या उंब-यावर बसून सगळं शांतपणे बघत होता.. पण काहीच बोलत नव्हता.. याचा भाऊ बहीण आणि तिचा भाऊ येऊन चार दिवस झालेले.. याची शुद्ध हरपलेली बहीण भाऊ उठना रे बोल काहीतरी माझ्याशी असं सारखं बोलत होती.. मेव्हणा दाजी उठाना काही नाही होणार तुम्हाला नका घाबरू असं बोलत होता.. बायको माञ प्रचंड खचलेली.. ऐन पस्तीशीत ती पन्नाशीची दिसू लागली….
आज दिवाळीचा पहिला दिवस.. संध्याकाळ झाली लोकांनी दारात पणत्या लावल्या.. सात आठ दिवस एकही शब्द न उच्चारलेल्या याने आज थोडे डोळे उघडले.. त्याची नजर घरभर भिरभरत होती.. बहिण हुशार होती तिने ओळखलं हा मुलांना शोधतोय.. तिने मुलांना त्याच्या जवळ बोलवलं..त्याने मुलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला..पण त्याला हात उचलताच येत नव्हता..अक्षरशः तो सापळ्या सारखा दिसत होता.. बहिणीने त्याचा हात हातात घेतला त्यच्या बायकोलाही जवळ बोलवलं…त्याचा हात मुलांच्या तोंडावरून फिरवला.. बारका तर खूपच भेदरला.. बाप आता अस्पष्टपणे फ्राॕक.. चप्पल.. बर्फी.. असं क्षीण आवाजात पुटपुटत होता.. आता त्याच्या बायकोच्या हातात त्याचा हात दिला.. ती हुंदके देत होती.. त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं बहुदा..पण त्याला ते जमलच नाही.. आता त्याचा आवाजही बंद झाला.. घशातून घरघर येऊ लागली.. शेजारी पाजारी जमले.. एक म्हातारी बाई म्हटली आता पोरांच्या हाताने याला शेवटचं पाणी पाजा..त्याची नजर बायको मुलांवर खिळली..पोरांनी चमच्याने बापाच्या तोंडात थोडं थोडं पाणी घातलं…. कुणालाच काही कळलं नाही.. पण मुलांकडे बघता बघताच त्याचा जीव कधीच निघून गेलेला…. बहीण आणि बायकोने जोराने हंबरडा फोडलां..मुलं घाबरली.. मोठी दोन तरी शांत बसली काय झालं बापाला हे कळल्याने.. पण धाकडा जोराने रडून बोलू लागला बाबा मला बर्फी नको.. ताईला फ्राॕक नको आणि दादाला चप्पल नको.. पण तू ऊठ ना लवकर.. तुझी शपथ मी आता कधीच बर्फी नाही मागणार पण तू ऊठना… बारक्याचं बोलणं ऐकून शेजारच्या आयाबायांचेही डोळे पाणावले.. बाहेर जग दिवाळी साजरी करीत असतांना या लहानग्यांचा बाप मात्र यांना सोडून कायमचा निघून गेलेला.. आता तो पुन्हा कधीच दिसणार आणि भेटणारही नव्हता….
त्याला पोटाचा कॕन्सर झालेला… त्याला सहा महिन्यांपुर्वीच तालुक्याच्या डाॕक्टरने सांगितलेलं.. मुंबईला जावं लागेल हे ही सांगितलेलं.. तुझं नशीब चांगलं असेल तर वाचशीलही असंही डाॕक्टर बोलला होता.. मी अगोदरच गरीब आहे त्यात माझ्या आजारपणावर कर्ज काढून मी मेल्यावर माझ्या बायकोच्या व लहानग्यांच्या खांद्यावर मला त्याचा भार टाकायचा नाही असं तो म्हणायचा.. हे सगळं सांगतांना त्याचा मिञही खूप रडला..
खरंच अन्नाची नासाडी करणाऱ्यांनी गरीबांना अन्न मिळवायला किती ञास होतो याची थोडीतरी जाणीव ठेवावीच.. आणि बापाबद्दल काय बोलू आता…. काळजात अपार मायेचा झरा असलेला माञ वरून कठोर आहोत असं दाखवणारा व्यक्ती म्हणजे बाप…. बाप शेवटी बापच असतो व कायम बापच राहील….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here