महापालिकेची ‘पुण्यदशम’ बसप्रवास योजना
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : महापालिकेच्यावतीने अवघ्या दहा रुपयात दिवसभरासाठी वातानुकुलीत बस प्रवास योजना आणण्यात आली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे नाव देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात २ जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या ५० मीडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी देण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये ३०० आणखी बस उपलब्ध केल्या जाणार आहेत. संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडण्यात आली होती. या योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत दिवसभरामध्ये दहा रुपयात वातानुकुलीत बसमधून कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. सीएनजीवर चालणा-या या मिडी बसची आसन क्षमता 24 आहे. छोटी बस असल्याने मध्यवस्तीतील लहान रस्त्यांवरुनही ही बस धावू शकणार आहे.






