मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांचं 1944 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण
बॉम्बे टॉकिजनं 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर 1998 ला आलेली किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.
दिलीप कुमार हे झुंजार वृत्तीचे होते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु त्यांनी यशस्वीपणे त्यावर मात केली. अगदी आयुष्याच्या 98 व्या वर्षी देखील ते आजारावर मात करुन घरी परतले. म्हणजे या वयात देखील त्यांची जिद्द कमालीची होती. त्यांची ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख होती.






