नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात १२ हा आकडा खूप गाजत होता. आता तो दिल्लीतही गाजायला लागला आहे. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आता १२ मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहे. यात काही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यात कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, बाबुल सुप्रीओ यांच्या नावाच समावेश आहे. राज्याच्या विधानसभेत १२ आमदारांचे निलंबन झाले होते. आता राज्याच्या मंत्रिमंडळातून १२ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचाही समावेश आहे. डी.व्ही. सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष कुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, धोत्रे संजय शामराव, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, सुश्री देबश्री चौधरी या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
संजय धोत्रे यांच्याकडे केंद्रीय शिक्षण, संचार तसेच इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रसार राज्य मंत्रीचा पदभार होता. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल बनविण्यात आले आहे.






