दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात आग

अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली स्थित केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या मुख्यालय इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याचं समोर येतंय. दिल्लीच्या लोधी रोडवर हे कार्यालय आहे.सकाळी जवळपास ११.३५ मिनिटांनी ही घटना घडली. आग लागल्याचं लक्षात येताच सीबीआय इमारतीत काम करणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं बाहेर पडले. या आगीत अद्याप कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही.

सीबीआय इमारतीतून येणाऱ्या धुराच्या लोटांनी परिसरातील अनेक नागरिक धास्तावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळतेय.

वीजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक चौकशीत समोर येतंय. सीबीआय इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये ही आग लागली होती. उल्लेखनीय म्हणजे, सीबीआयच्या हेडक्वार्टर अर्थात मुख्य कार्यालयात वेगवेगळ्या प्रकरणांचे महत्त्वाची कागदपत्रं असतात. त्यामुळे या आगीत काय नुकसान झालंय तसंच या आगीमागे नेमकं काय कारण आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here