सहा हजार शिक्षण सेवकांची पदे भरण्यास सरकारची मान्यता

पवित्र प्रणालीच्या माध्यमातून होणार पारदर्शक प्रक्रिया

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यातील सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रिया सुरू होत आहे.

राज्यात डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे.नकोविडच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे आदेश वित्त विभागाने जारी केले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया प्रलंबित होती.

पण शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त होती. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पदभरतीच्या बंदीतून ‘पवित्र’ प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here