पंकजा मुंडेकडून अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांचं अभिनंदन
मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दुपारपर्यंत संभाव्य नेते असं सुरु अभिनंदन करणं योग्य नव्हतं असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.
“आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.






