आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला तत्वतः मान्यता

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच कोवीड १९ च्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी तरतूद करण्यास मंजूरी देण्यात आली. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोवीड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. सुहास प्रभू, डॉ. शंशाक जोशी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे प्रा. रवी सिन्हा, राजेंद्र पवार, डॉ. संजय लाखे पाटील, महेश कांबळे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अजित देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी पाच वर्षात सुमारे ३ हजार ६३५ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जिवीत हानी होऊ नये, यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पात सुचविलेल्या उपाययोजना ठरविताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावेत. बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारे बांधणे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, वीज अटकाव यंत्रणा बसविणे या उपाययोजनांची प्राथमिकता ठरवून कामे सुरू करण्यात यावीत.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोवीड ही आरोग्यविषयक जागतिक आपत्ती आहे. अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये कोवीड संसर्गाची चिंताजनक स्थिती आहे. तर काही ठिकाणी कोवीडचे नवीन विषाणू दिसून येत आहेत. पुढील काळात हा संसर्ग वाढू नये, यासाठी टास्क फोर्सच्या मदतीने नियोजन करण्यात यावे. कोवीड उपाययोजनांसाठी राज्यशासन निधी कमी पडू देणार नाही. जगभरात तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. कोवीड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची चाचणी करावी का, बुस्टर डोस घ्यावा का याबद्दल चर्चा सुरू आहे. याबरोबरच निर्बंध शिथिल करण्याचीही मागणी होत आहे. आर्थिक गाडा सुरु करण्यासाठी राज्य शासनाने विविध उद्योजकांबरोबर चर्चा करून कोवीड प्रोटोकॉल पाळून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हात धुणे, मास्क वापरणे व योग्य अंतर राखणे या उपाययोजनांवर भर देऊन कामे सुरू करण्याच्या सूचना उद्योजकांना केल्या आहेत. त्याचबरोबर उद्योग परिसरात कामगारांची राहण्याची तयारी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यासाठी राज्यशासन मदत करण्यास तयार आहे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी निधी दिल्यामुळे चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कोकणाबरोबरच मराठवाड्यात सुद्धा वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात माहिती मिळावी, अद्ययावत यंत्रणा असावी, यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच राज्य आपत्ती निवारण दलाच्या प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळावी.

टास्कफोर्सचे सदस्य डॉ. ओक म्हणाले की, कोवीड आपत्ती ही पहिल्यांदाच सर्व जग अनुभवत आहे. यापुढील काळात नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता असल्याने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. तसेच कोवीड संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण, औषधे व चाचण्यांसाठीही निधी उपलब्ध करावा लागेल. यावेळी डॉ. शंशाक जोशी, महेश कांबळे, सुहास प्रभू, राजेंद्र पवार आदींनी यावेळी मते मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here