ईगतपूरी येथे रेल्वेच्या इमर्जन्सी व्हॅनलाच लागली आग

ईगतपूरी ( प्रतिनिधी ) : इगतपुरीतील टिटोली रेल्वे यार्डात मार्शलिंग लाईन-४ वर उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या (९६८७८) डब्याला आज दुपारी २.४५ च्या सुमारास अचानक आग लागली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी मालगाडीसह इतर रेल्वेदेखील चेक करण्यासाठी उभ्या केल्या जातात.

घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि लोहमार्ग पोलिसह घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. महिंद्रा अन् महिंद्राच्या इगतपुरी प्रकल्पातील अग्निशमन दलाची मोठी मदत झाली.

आग लागण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या रेल्वेमधील गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जाता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here