युरोकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष
लंडन : गेल्या महिन्याभरापासून २४ संघांत झालेल्या थरारक लढतींनंतर अखेर आज रविवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पटलावर विजेत्याचा उदय होईल. चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवून स्वप्नवत कामगिरी करणारा इंग्लंड आणि गेल्या दोन वर्षांपासून आपल्या वैविध्यपूर्ण खेळाद्वारे प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवणारा इटली हे दोन संघ वेम्बले स्टेडियमवर वर्चस्वासाठी झुंजतील, तेव्हा जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष आपसूकच त्यांच्याकडे वेधले जाईल.
फुटबॉलमध्ये ‘फिफा’ विश्वचषकानंतर युरो चषकाला सर्वाधिक प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते. युरोपियन देशांच्या फुटबॉलमधील वाढत्या मक्तेदारीमागे युरो चषकाचा मोलाचा वाटा आहे. गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ यंदा पहिल्यावहिल्या युरो चषकावर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारणाऱ्या इंग्लंडला रोखणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
त्याच वेळी रॉबर्टो मान्चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील. स्पर्धेतील सर्व सामने जिंकणारा इटलीचा संघ सांघिक कामगिरीद्वारे इंग्लंडवर वरचढ ठरू शकतो, परंतु त्यांना अंतिम फेरीत इंग्लंडच्या ११ खेळाडूंसह त्यांच्या चाहत्यांचाही सामना करावा लागेल. त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर काही दिवसांपासून रंगलेल्या ‘इट्स गोइंग रोम ओर इट्स कमिंग होम’ या द्वंद्वाचे उत्तर मिळवण्यासाठी तमाम चाहते उत्सुक आहेत. इटलीचा संघ चौथ्यांदा, तर इंग्लंड प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. यापूर्वी इटलीने १९६८ मध्ये ही स्पर्धा जिंकली असून, २००० आणि २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.






