अर्जेंटिनानं ब्राझीलला १-० अशा फरकानं हरवून विजेतेपदावर नाव कोरलं
रिओ द जानेरो : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला.
यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. कोपा अमेरिकन स्पर्धेत दोन पारंपरिक संघात लढत रंगदार लढत बघायला मिळाली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं.
फुटबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.






