शिंदखेडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करुन शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये आज दिनांक 12 जुलै 2021 पासुन ते दि. 24 जुलै 2021 पर्यंत शिवसेना प्रत्येक पंचायत समिती गण व नगरपालिकेच्या वार्डा-वार्डात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जाणार असल्याची माहिती शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी पत्रकान्वये दिली आहे.
सविस्तर वृत्तानुसार, नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलाविली होती. सदर बैठकीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पंचायत समिती गण व नगरपालिका प्रभागात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश केले होते. त्यानुसार धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा विधानसभा मतदार संघ व शिरपूर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क मोहिमेची सुरुवात आज शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बेटावद गटातील वारुळ गणात वारुळ येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सदर अभियानाची सांगता दिनांक 27 जुलै 2021 रोजी शिरपूर शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील बैठकीसह होणार आहे.
सदर अभियान अंतर्गत शिवसेनासह सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असुन प्रत्येक गण व प्रभागात शिवसेनेचे संघटन मजबुत करणे व महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, तसेच सद्य परिस्थितीत कोविड-19 च्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजलेला असतांना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी “माझे गांव कोरोनामुक्त गांव” हे अभियान गावागावात राबविण्यासाठी शिवसेनेच्या दक्षता समिती स्थापन करणे, प्रशासनाच्या माध्यमातून गांव कोरोनामुक्त करणे, शिवसेना सभासद नोंदणी, नविन पदाधिकारी नियुक्त्या, नविन मतदार नोंदणी, नागरिकांच्या समस्या आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी सदर शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.






