बेळगाव : नागालँड सीमेवर गस्त घालत असताना जंगल भागात मोटारीचा अपघात होऊन गोकाक तालुक्यातील जवानाला वीरमरण आले. मंजुनाथ अप्पाणा गौडन्नावर (वय ३८, शिवापूर, कोण्णूर) असे त्या जवानाचे नाव आहे.
मंजुनाथ गेल्या अठरा वर्षांपासून मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सेवा बजावत होते. सध्या ते नागालँडच्या सीमेवर वाहन चालक म्हणून कार्यरत होते. रविवारी ते गस्तीवर असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी 12 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गोवा येथे येणार असून तेथून ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. शिवापूरमधील शाळेत पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
गौडन्नावर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिवापूर- कोण्णूर गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी पार्थिव येण्यास उशीर झाल्यास मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतील निकटवर्तीयांनी दिली.






