नाना पटोलेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले

ajit-pawar

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची माहिती घेऊन आरोप करावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी त्यांना दिला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर नाना पटोलेंनी केलेल्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले असून त्यांनी नाना पटोले यांची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दांत आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केल्याची बातमी सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जातोय. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भुमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका मविआला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे, असेही अजित पवारांनी सांगितल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here