एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ

पुण्यातील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाची कारवाई

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं. आता गुरुवार म्हणजेच १५ जुलैपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या घडामोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here