महानगर गॅस लिमिटेडने उद्यापासून मुंबईत सीएनजी गॅसच्या किमतीत केली वाढ
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत उद्यापासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने बुधवारपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीने मुंबईतील लाखो रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी गॅस दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. वाहतूक आणि इतर खर्चात वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने दिले आहे. त्यानुसार सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे.
या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा भाव एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका वाढेल. तर पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रती युनिट दर असेल, असे कंपनीने म्हटलं आहे.






